TANHAJI : The Unsung Warrior


Image result for tanhaji poster
pc: google/tanhajiposter



यथो हस्त तथो दृष्टी ।
यथो दृष्टी तथो मनः ।
यथो मनः तथो भाव । 
यथो भाव तथो रस ।
                                                                                
अर्थात 
                                                                                                                                
जिथे हात, तिथे दृष्टी 
जिथे दृष्टी, तिथे मन 
जसे मन, तश्या भावना 
जश्या भावना, तसा रस 


 – नाट्य शास्त्र


****

याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'तान्हाजी' अवश्य पाहायला हवा. 
९ रस यथोचित पहावयास मिळतील. 

संक्षिप्त सांगायचं झालं तर, 
१. शृंगार रस : काजोल (सावित्रीबाई मालुसरे)
२. रौद्र रस : अजय देवगण (तान्हाजी मालुसरे)
३. कारुण्य रस : शरद केळकर (शिवाजी महाराज) 
४. बीभत्स रस : अजिंक्य देव (चंद्राजी पिसाळ)
५. भयानक रस : सैफ अली खान (उदयभान सिंग राठोड)
६. हास्य रस : हार्दिक संगानी (गोंद्या) 
७. वीर रस : सर्व मावळे 
८. अद्भुत रस : कोंढाण्याचा कडा चढून जाण्याची सर्व दृश्ये आणि त्यातल्या त्यात घोरपडे बंधूंचा कडा सर करण्याचा वेग 
९. शांत रस : कोंढाण्यावर भगवा फडकावणारे अजय (तान्हाजी)

****

काजोल (सावित्रीबाई मालुसरे):

अभिनयाने पात्र साकारणं एक गोष्ट आणि ते पात्र 'जगणं' दुसरी गोष्ट. कलाकाराचा खरा कस लागतो तो इथं. नुसत्या अभिनयातून पात्र उभं करण्याच्या पलीकडे जाऊन ती व्यक्तिरेखा एक जिवंत व्यक्ती म्हणून समोर उभी करणं खरंच अवघड. पण काजोल यांनी  ते करून दाखवलंय. आणि नुसतं दाखवलंच नाही तर त्यातून जे पोहचवलं जायला हवं ते जशास तसं  पोहचवलं  देखील. 



अजय देवगण (तान्हाजी मालुसरे):

मराठ्यांचा शूर इतिहास आजवर फक्त पुस्तकात वाचला होता. पुस्तकातला असा  'शूर' शब्द कळत होता पण वळत नव्हता. अजय यांनी तो 'दाखवला'.  स्वतःला ओतून देऊन काम करणे काय असतं  हे या अभिनयातून दिसून आलं . तान्हाजी मालुसरे यांचा  असलेला जिजाऊ माँसाहेबां विषयीचा आदर आणि शिवाजी महाराजांवरील प्रेम, स्वराज्य मिळवण्याचं शिवरायांइतकंच मोठं ध्येय आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची - वेळ प्रसंगी जीवही देण्याची तयारी हे सर्व काही आणि याही पुढे जाऊन अजून बरंच  काही प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात अजय यशस्वी झालेले आहेत. 



शरद केळकर (शिवाजी महाराज):

शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा तितक्याच दमदारपणे उभी करणं  हे सर्वात आव्हानात्मक काम म्हणावं लागेल. ज्या व्यक्ती विषयी समाज भावनिक पातळीवर जोडलेला आहे त्या व्यक्तिरेखेच्या अभिनयात तितकं वजनं निर्माण करणं हे खरंतर जिकीरीचं काम. पण शरद यांनी ते सुरेखरित्या हाताळलं आहे. 

इतके दिवस आपल्याला शिवाजी महाराज जास्त करून स्वराज्य, मावळे, मराठा (मुघलांसाठी मरहट्टा), गनिमी कावा, लढाया अशा गोष्टींमुळे परिचयाचे होते. पण शरद यांनी त्यांच्या अभिनयातून कमाल केली आहे. शिवाजी महाराजांचं 'आपल्या' लोकांवरील प्रेम, त्यांच्या विषयीची करुणा अशा अनेक भावनिक प्रसंगातून शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा जी त्यांनी साकारली आहे, ती त्यांच्यातल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. 

तान्हाजींना सुरवातीस मोहिमेचा पत्ता लागू न देणं, तान्हाजी सोबत भाला लढाई दरम्यान पिसाळांना भुवई उंचावून दाखवणं, राजगडावर उभं राहून तान्हाजी साठी अश्रू ढाळणं आणि रायबाच्या लग्नाला हजर राहणं, अशा अनेक प्रसंगातून एक वेगळेच आणि आपलेसे शिवाजी महाराज समोर उभे राहतात आणि लक्षात राहतात हे शरद यांचं यश म्हणावं लागेल.



पद्मावती राव (माँसाहेब जिजाऊ):

या एक कन्नड अभिनेत्री आहेत. जिजाऊ साहेबां इतकं भारदस्त व्यक्तिमत्व साकारण्यात मला वाटतं  या थोड्या कमी पडल्या आहेत. अभिनय चांगला  पण शिवाजी महाराज्यांच्या आईसाहेब  जिजाऊ म्हणून जी संवादफेक ज्या वेगाने , ज्या वरच्या आवाजात यायला हवी तिथे कमतरता जाणवते. 

याहीपेक्षा अभिनयात ताकदवान आणि ज्या वयाच्या जिजाबाई दाखवल्या आहेत, त्यासाठी सुहास जोशी या मला वाटतं काहीशा योग्य राहिल्या असत्या. 

तितकाच प्रखर आणि जोरदार अभिनयक्षमता आणि या पात्रास साजेशी संवादफेक क्षमता असलेल्या, शिवाय हे पात्र साकारण्याचा अनुभव असलेल्या मृणाल कुलकर्णी यादेखील सुयोग्य ठरल्या असत्या. 



सैफ अली खान (उदयभान सिंग राठोड):

चांगल्या गोष्टी आधी बोलायच्या झाल्याच तर उदयभानची औरंगजेबाचा अंगरक्षक म्हणून असलेली निष्ठा, स्वतःच्या सैन्याला शिस्त लावण्यासाठी त्याने केलेल्या कडेलोट, फाशी अशा शिक्षा, मराठ्यांना चकवा देण्यासाठी मराठ्यांचाच वापर करण्याची युद्धनीती, घोडा चालत असतांना त्याच्या पाठीवर झोपणं, इतकं  मोठं सैन्य घेऊन शत्रूवर चाल करून जाण्यासाठी आवश्यक नेतृत्व, अशा काही  गोष्टी  सैफ यांनी उत्तम प्रकारे हाताळल्या आहेत.

तरीही, खलनायक म्हणून सैफ हे काहीसे कमी पडल्याचं  जाणवतं. हत्तीची सोंड कापताना जी क्रुरता दिसायला हवी, ती दिसली नाही. कमलाला लग्नासाठी मागणी घालतांना जे प्रेम दिसून यायला हवं, ते दिसलं; पण त्यानंतर  बंदी कमलाला लगट करण्याच्या प्रयत्नात जो बदला घेण्याचा भाव असायला हवा अथवा प्रेम दाखवणं असेल म्हणा, ते नाही दिसून येत. त्यानंतर कमलाने लग्नास 'हो' म्हणल्यावर झालेला आनंद दाखवताना, अष्टमीच्या रात्री लग्नाआधी नाचतांना तो उदयभान कमी आणि स्वतः सैफच जास्त वाटले. शिवाय शेवटी तोफेला बांधून खाली ढकलल्यावर सैफ म्हणून हसण्यापेक्षा उदयभान म्हणून मरण स्वीकारलं असतं तर जास्त योग्य वाटलं असतं. 

अशा बऱ्याच प्रसंगात रणवीर सिंग यांचा अलाउद्दीन खिलजी आठवला. मला वाटतं एखाद्या अभिनेत्याच्या बाबतीत एका पात्राच्या अभिनयादरम्यान दुसरा कोणी अभिनेता आठवावा हे काहीसं अपयश म्हणावं लागेल.



कैलास वाघमारे (चुलत्या):

उल्लेखनीय कामगिरी. झोकून देऊन काम करणे ज्यास म्हणतात ते कैलास यांनी त्यांच्या  अभिनयातून दाखवून दिले. हाती आलेल्या संधीचा सदुपयोग करणे हे कैलास यांना जमलेले दिसते. भूमिका छोटीशी असली तरी तिला योग्य तो न्याय देणे जमले पाहिजे, जेणे करून प्रेक्षकांना ती लक्षात राहील. चुलत्या अशाच प्रकारे ग्रे शेडमध्ये असला तरी याच कारणाने लक्षात देखील राहतो. 


ओम राऊत (चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक):
दिग्दर्शक आणि लेखक म्हणून कारकिर्दीतला दुसराच चित्रपट. पण हि बाब जाणवू नये इतकी सुंदर कलाकृती या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणली यासाठी कौतुकास्पद. काही लहान सहान कमतरता आहेत; तरीही, भविष्यात आणखी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 'तान्हाजी' हा एकंदरीत विषय अशा प्रकारे हाताळणं आणि त्यातल्या प्रत्येक पात्रास त्या त्या पातळीवर सामावून घेऊन कथानक पुढे नेणं ही खरी तर कसरतंच, पण तोल जाऊ न देता बरोबर जमलीय. काही ठिकाणी पडायला आल्यासारखं झालंय पण तितकंस आपण प्रेक्षक म्हणून सांभाळून घेऊ शकतो. 


****

पाहण्यासारखं :
१. मराठ्यांचा शूर इतिहास. 
२. कोंढाण्याची लढाई. 
३. काजोल, अजय, शरद यांचा दमदार अभिनय. 
४. मराठी व्यक्तिरेखेतल्या काजोल. 

मला खटकलेल्या काही गोष्टी:
१. 'एक मराठा लाख मराठा' ही  घोषणा अजून ताकदीने आणि आणखी आवेशाने करता आली असती. 
२. 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे' हा संवाद मराठीत ठेवायला हवा होता. 
३. सैफ च्या जागी आणखी कोणी तरी घ्यायला हवं होतं .  (पुन्हा एकदा रणवीर सिंग :) )
४. शंकरा रे शंकरा हे पूर्ण गाणं  आणि त्यात अजय यांचा नाच(?) . मुळात या गाण्याची आवश्यकता वाटत नाही. आणि त्यात पुन्हा अजय यांचा नाच कुठेच मेळ खात नाही. तसा तर दिसायला नाचही वाटत नाही. फक्त थोडाफार हात आणि पायांचा लयबद्ध व्यायाम केल्यासारखं वाटतं . 
५. 3D इफेक्ट येण्यासाठी केल्या गेलेल्या चित्रीकरणाच्या नादात काही दृश्ये 2D मध्ये विचित्र वाटतात. 
६. काही प्रसंगी स्पेशल इफेक्ट्स  जाणवण्या इतपत अती आहेत. 

****



- मीप्रतिक 





Comments

Popular posts from this blog

Do We Really....?

“Hey man! You have changed a lot.”