अभ्यास नकोसा वाटतो : भाग २
मला क्रिकेट अतिशय बोअर होतं. एक जण बॉल टाकतो. दुसरा त्या बॉलला बॅटने यथेच्छ मारतो. शेवटी ज्या दिशेने तो बॉल गेला असेल त्या जवळपासचा तिसराच कोणी तरी पळत जाऊन तो बॉल पकडून पहिल्या बॉल टाकणाऱ्याकडे फेकतो. हे सगळं किती तरी तास असंच चालू राहतं. एकच गोष्ट रिपीट रिपीट आणि तासंतास. बघणारेपण तेच ते बघत राहतात. मधूनच आरडा ओरडा करतात. हे सगळं कशासाठी? मला आज पर्यंत कळलंच नाही. (कदाचित कळणार देखील नाही.)
मी लहान होतो. तेव्हा माझा मामा टीव्हीवर हे क्रिकेट लावून बसायचा. सारखं सारखं तेच ते पाहून मला मग कंटाळा यायला लागला. तेव्हा पासून माझ्यासाठी क्रिकेट हा नावडीचा खेळ झाला. (मुळात याला खेळ म्हणावं यावरच मला आक्षेप आहे. तो मुद्दा बाजूला.)
थोडं मोठं झाल्यावर कळलं की हे रिपीट रिपीट करण्यात पण नियम असतात. आधीच कंटाळा. त्यात पुन्हा नियम शिका. कोणी सांगितलंय ? तर म्हणे, काय चाललंय ते कळणार कसं ? नाही कळून घ्यायचं मला. मग मी शिकलोच नाही. आज पर्यंत नाही.
परिणाम, गल्लीतली, शाळेतली मुलं क्रिकेट खेळायची, त्याविषयी बोलायची, मला खेळताही येत नव्हतं आणि बोलायलाही काही नसायचं. चुकून कधी गेलोच तर ना मला बॅटींग येत होती ना बॉलिंग. बॅटींग करायला गेलो तर पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलला स्टंप आउट व्हायचो आणि बॉलिंग दिली तर एक तर बॅट्समन सोडून भलत्या दिशेने तरी बॉल पडायचा आणि चुकून बॅट्समनच्या दिशेने गेलाच तर कधी दोन टप्पे खाऊन जायचा तर कधी टप्पा न पडता त्याच्या डोक्यावरून मागे जायचा. मग मला सगळे जण लिंबू टिंबू म्हणून फक्त फिल्डिंग करायला घ्यायचे. अशा प्रकारे मी क्रिकेटपासून आणि क्रिकेट माझ्यापासून दूर दूर होत गेलो. एकंदरीत, मी या क्रिकेट नावाच्या गोष्टी पासून आज कोसो मिल दूर आहे.
****
असंच काहीसं मुलांचं अभ्यासाबाबतीत होतं. बालवाडीत जातात तेव्हा मुलं (काही अपवाद वगळता) फार उत्साहाने जातात. नंतर तिच शाळा अभ्यासाच्य दृष्टीने नकोशी होते. फक्त मार्कांसाठी, दुसऱ्यापेक्षा जास्त मार्क्स पडून पुढे जाण्यासाठी, मी अभ्यासात किती भारी हे मिरवण्यासाठी शाळा आणि शाळेचा अभ्यास उरतो. केव्हा तरी हे सर्वजण कॉलेजला जातात. सगळ्यांनाच जावं वाटेल आणि जायला मिळेल असं म्हणत नाही मी. पण त्यातही फार कमी जण अभ्यास करण्यासाठी जातात. कॉलेजलाईफचा अनुभव आणि काही तरी डिग्री घेण्यासाठी तेवढे जातात. जे खरंच सिरिअसली जातात, त्यांतही फार कमी जणांना अभ्यास करावासा वाटतो. त्यातले बरेच जण चांगले मार्क्स पडावे आणि चांगला जॉब मिळावा यासाठी अभ्यास करतात. आता मोजायला घेतलं तर कळेल, दशांगुळे मोजून पण उरतील इतकी कमी मुले खरोखर अभ्यास करण्यासाठी जातात, ज्यांना खरंच अभ्यास करावा वाटतो.
तर उर्वरित जनता, ज्यांना अभ्यास नकोस वाटतो त्यांचं पहिलं कारण अभ्यासाचा कंटाळा. जसं माझं क्रिकेटच्या बाबतीत झालं तसं त्यांचं अभ्यासाच्या बाबतीत होतं. रोज त्याच त्या शाळेत, त्याच त्या वर्गात, त्याच त्या मुलांसोबत दिवसभर बसा आणि त्याच त्या शिक्षकांकडून तेच ते विषय तसेच शिकत राहा. यावर सध्या तरी काही उपाय नाही हे मान्य पण पर्याय भरपूर आहेत. (हा तूर्तास या लेखाचा विषय नाही.) मी याच्या विरोधात नाही. पण याची परिणामकारकता शून्य आहे असं मला वाटतं. कारण परिणाम काय, तर कंटाळा. मुळात कंटाळा अभ्यासाचा नाही तर या एकसूरीपणाचा येतो. रोज तोच तो दाळ भात खायला दिला तर तुम्हाला कसं वाटेल? तसं आहे हे.
लहान हत्तीला साखळदंडाने बांधून ठेवतात. खूप प्रयत्न करून पण तो ते तोडू शकत नाही कारण तेव्हा पुरेशी ताकद नसते. पण त्याच्या मनात असं प्रोग्रामिंग होतं की कितीही ताकद लावा ही साखळी काही तुटणार नाही. नंतर मोठं झाल्यावर त्याच हत्तीमधे तोच साखळदंड तोडण्याची ताकद निश्चित असते. पण आता त्याच्या मनात बसलेलं असतं, की आपण हे तोडू शकत नाही.
असंच मुलांमध्ये अभ्यासाबाबत वातावरण निर्मिती होताना होतं. लहानपणी कंटाळा येण्याची इतकी सवय होऊन जाते की मोठेपणी जेव्हा यात बदल करण्याची पात्रता येते तेव्हा ती बौद्धिक आणि मानसिक ताकदच उरत नाही. आणि मग हीच मुलं या कंटाळ्याच्या जोखडात राहून परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करून ( ज्याला हे अभिमानाने ' नाईट मारून ' अभ्यास केला असं म्हणतात ) कसेबसे पास तर होतात ; सगळेच होतात अशातला पण भाग नाही . पण डोक्यात काही उरत नाही. मुळात काही गेलेलंच नसतं. मेंदूची एक टेम्पररी मेमरी असते. तीच तेवढ्या वेळापुरती कामी येते. पर्मनंट मेमरी पर्यंत अभ्यास पोहचलेलाच नसतो.
एक वैज्ञानिक अभ्यास असं सांगतो, की मेंदूला रोज नवीन गोष्ट दिली म्हणजे वैचारिक खाद्य पुरवलं तर मेंदू ताजातवाना आणि तरतरीत राहतो. त्यातून त्याची कार्यक्षमता देखील वाढते. रोजचा ' तोच तो ' पणा याला मारक ठरतो. आणखी एक वैज्ञानिक अभ्यास असं सांगतो, की मेंदूमधले दोन न्यूरॉन्स जुळले की बनतो एक सिनॅप्स, त्यातून पुढे जाऊन बनते स्मरणशक्ती आणि मेंदूची सजगता. हेच जर अभ्यासाबाबतीत घडलं तर तो अभ्यास ' अंगी ' लागू शकतो.
आता प्रश्न येईल म्हणजे नक्की काय?
तर करायचं हे की मेंदूला रोज काही तरी नवीन चालना द्यायची.
मग प्रश्न येईल अभ्यास, पुस्तके, शिक्षक, इतर मुलं, वर्ग, शाळा हे तर बदलणार नाही. मग अभ्यासात रोज नवीन काय देणार?
तर करायचंय हे की, गोष्टी आहे त्याच राहतील पण या असलेल्याच गोष्टींमधला कंटाळा निघून जाईल.
नक्की काय करायचं तर रोजचं ' ये रे माझ्या मागल्या ' काढून ' आज काय नवीन करता येईल? ' याचा विचार करायचा. नुसता विचार नाही तर कृती पण करायची. शक्य असल्यास एकट्याने, शक्य असल्यास ग्रुपने. मुलं लहान असतील तर पालक, शिक्षक त्यांना मदत करू शकतात. तुम्ही काही नवीन कराल तर नवीन सिनॅप्सेस बनतील. जो अभ्यास शिकण्यासाठी तुम्हाला तासंतास मेहनत करावी लागते, ते कमी वेळात शिकता येईल . यातून अपेक्षित परिणाम देखील मिळेल. अभ्यासातला ' कंटाळा ' कमी होईल. नुसतं मार्कांपुरता अभ्यास करण्यापेक्षा त्यात आवड निर्माण होईल. पाठांतर करून किंवा ' नाईट मारून ' परिक्षेत लिहण्यापुरता मर्यादित न राहता तोच अभ्यास जास्त काळासाठी लक्षात राहील.
बॉल टाकतांना तो डोक्यावरून जाऊ नये यासाठी मी कधीच प्रयत्न केले नाही. त्यापेक्षा फिल्डिंग बरी म्हणून बॉलिंग करणं सोडून दिलं . पण अभ्यासातल्या ' त्याच त्या ' पणाने जर अभ्यास नकोसा होऊन डोक्यावरून जात असेल तर जमणार नाही . अभ्यास सोडून देखील जमणार नाही. त्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून एकदा का अभ्यासात रस आला तर नंतर तुम्ही माझ्यासारखे ' लिंबू टिंम्बू ' राहणार नाही.
तर मग हे करायचं कसं ?
ते पुढील भागात ..
(क्रमशः)
#मीप्रतिक
****

Part 1 is here: https://spratik08.blogspot.com/2020/05/blog-post_23.html
ReplyDeletePart 3 is here:
ReplyDeletehttps://spratik08.blogspot.com/2020/05/blog-post_25.html