अभ्यास नकोसा वाटतो : भाग ३
" ये है आम जिंदगी "
.
.
.
" ये है मेंटॉस जिंदगी "
.
.
.
किती जणांच्या बाबत हे वाचून " दिमाग कि बत्ती जल गयी " ?
****
शिक्षकांनी$ प्रश्न विचारायचे आणि विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे .
-- ये है आम जिंदगी .
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे ( शंका नाही ) आणि शिक्षकांनी$ उत्तर द्यायचे .
-- ये है मेंटॉस जिंदगी .
$इथे शिक्षक आणि पालक दोन्हीही अपेक्षित आहे. शिकवणं हे शिक्षकांचं काम आहेच आणि तेच घरात पालकांचं . शिकवून झाल्यावर मुलांना कळलं की नाही हे समजण्यासाठी प्रश्न विचारायचे . ते तर तुम्ही परीक्षेत पण करतातच ना. आता मुलांना सांगायचं तुम्ही प्रश्न विचारा .
वर वर सोपं वाटेल हे. ते विचारतील आणि तुम्ही उत्तर देताल . नवीन काय यात ?
तर त्यांना सांगायचं प्रश्न असा विचारा ज्याचं उत्तर देणं तुम्हाला - शिक्षकांना / पालकांना - अवघड होईल. अगदी सुरवातीला त्यांचे प्रश्न सुद्धा इतके प्रगल्भ नसतील. अपेक्षाही नाही. कारण अवघड प्रश्न विचारण्यासाठी त्यांना आधी अभ्यास करावा लागेल. तेच तर हवं आहे ना .
मुलांच्या बाबतीत ' मला तुम्ही एखादा प्रश्न विचारताय आणि मला त्याचं उत्तर नाही देता येत ' असं झालं तर त्यांना मनातून खजिल झाल्यासारखं वाटतं . ' छे ! मला इतकंही येत नाही . ' यातून सुरवातीला नैराश्य येतं . मानसिक पातळीवर बऱ्याच नकोशा गोष्टी घडतात आणि शेवट अभ्यासापासून दूर जाण्याने होतो. हे असंच राहिलं तर नंतर मात्र सवय होते . ' मला काहीच येत नाही .' या टोकावर जाऊन पोहचल्यावर मात्र प्रकरण भलतं वळण घेऊ शकतं .
म्हणून प्रश्न त्यांना विचारायला लावायचा. हे काही मुलांनी नुसता अवघड प्रश्न विचारून संपणार नाही. आता पुढचा भाग , प्रश्न असा असावा की त्याचं उत्तर त्यांनाही देता यायला हवं . यातून होईल हे की त्यांना तर उत्तर येत असेलंच पण तुम्ही पण त्यांना अपेक्षित किंवा तिथपर्यंतचं उत्तर दिल्यास त्यांना स्वतःलापण ते उत्तर येण्याचं समाधान मिळेल. कदाचित तुम्ही तुमच्या समजेने अजून भारी उत्तर दिलंत तर त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडेल.
एकंदरीत, अभ्यास ही प्रक्रिया काही तरी फळ देईल. तुमचं आपापसातलं बॉंण्डिंग वाढेल. मुलं आणखी मनमोकळेपणाने प्रश्न विचारतील. त्यासाठी आधी स्वतःहून अभ्यास करतील. हेच तर अपेक्षित आहे ना ?
स्वाध्यायचा संधी विग्रह केला तर कळतं स्व + अध्याय . या उपक्रमातून खरा स्वाध्याय होईल , अशी अपेक्षा .
मला इतकं कळतं की , हे जशास तसं करण्यात शाळेच्या पातळीवर बऱ्यापैकी मर्यादा आहेत. वेळ , अभ्यासक्रम , परिक्षा आणि हे कमी म्हणून शिक्षकांना इतर अभ्यासाहून ' महत्वाची ' सरकारी कामं . ( अतिशय वादग्रस्त मुद्दा . काही शिक्षकांना मात्र अभ्यास सोडून ' हे ' सर्व आवडतं . असो . ) पण हे बाजूला ठेवलं तर कमीत कमी घरात तरी इतकं होऊ शकतं . बरं , रोज नाही जमणार कदाचित. आठवड्यातून एक दिवस तरी जमेल ? आठवडी चाचणीत मुलांनी फक्त उत्तरंच का द्यायची ? प्रश्न पण विचारू देत.
काही पालकांनासुद्धा वेळेची मर्यादा असते. त्यांना स्वतःची कामे थोडी आहेत का ? म्हणून हे सांगा ? आणि त्यातपण सर्व पालकांना सर्व विषय येतील अशी अपेक्षा करणं पण चुकीचं .
मग असं तर करता येईल ना ? मुलांचे ' पाच जणांचा एक ग्रुप ' असे आपापसात ग्रुप बनवायचे . प्रत्येक जण इतर चौघांना प्रश्न विचारेल आणि स्वतःसुद्धा उर्वरित चार जणांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल . आता स्वतःच्याच एका प्रश्नावर चार उत्तरे , कदाचित चार वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेली . लक्षात तर राहतील ना. नाही पूर्ण लक्षात राहणार पण थोडंफार तर लक्षात राहील . परिक्षेत लिहण्यापुरतं ?
कॉलेजच्या मुलांबाबत हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं . एक म्हणजे त्यांच्यात प्रश्न ' तयार ' करण्याची प्रगल्भता असते . विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची मानसिक पातळी असते . राहिला प्रश्न उत्तराचा . तर प्रश्न बनवतांना अभ्यास झालेला असतो तर उत्तरही येऊ शकतात. सारांश , कॉलेज पातळीवर हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवता येऊ शकतो . इथे ग्रुप तर असतोच , वेळ सुद्धा काढता येऊ शकतो . राहते फक्त तयारी - अभ्यासाची .
मुद्दा हा की, प्रश्न विचारण्याआधी अभ्यास करतांना ' अवघड प्रश्न ' बनवण्यासाठी तरी ' अभ्यास ' होईल . कदाचित यातून आणखी नवीन मार्ग सुद्धा निघतील . नवीन अभ्यास पद्धती समोर येतील . मुले अजून काही तरी नवीन शोधून काढतील . झालंच तर काही तरी नवीन घडेल .
मला वाटतं , ' परिक्षेत काय दिवे लावले ? ' असा प्रश्न येण्याच्या खूप आधी ' दिमाग की बत्ती ' उजळलेली असेल .
#मीप्रतिक
(क्रमशः)
****

Part 2 is here:
ReplyDeletehttps://spratik08.blogspot.com/2020/05/blog-post_24.html
Nice
ReplyDeleteWow great idea and mind blowing explanation
ReplyDelete