अभ्यास नकोसा वाटतो : भाग ४
"Please tell us the treatment for pulmonary tuberculosis."
"Crebral maleria collectively is a ..."
"नहीं "
" अरे ऐसी नहीं करनेका। ... ऑर्डर ब्रेक नहीं करनेका। बहोत मुश्किल से रट्टा मारके आया हू मैं।
"There are two stages of treatment. Intensive therapy for two months which includes four drugs. anacin, peniciline,"
"refantcine "
" अरे बीचमे नहीं बोलनेका ना यार। पूरा जो मेरा रिदम है न तुम.... अभी वापस शुरू करना पड़ेगा। "
****
' लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर ' म्हणून एक गोष्ट तीनदा लिहायला सांगतात. काही ठिकाणी पाचदा , दहादा तर हे कमी म्हणून काही ठिकाणी पंचवीस वेळा लिहायला सांगतात. खरंच लक्षात राहतं याने ? ' पाठांतर ' खरंच होतं असं करून ? की ' पाठांतर ' या गोंडस नावाखाली फक्त घोकंपट्टी केली जाते ? तासंतास घोकत बसल्याने खरंतर उत्तर लक्षात राहत नाही. तर त्या उत्तरातल्या शब्दांची एका नंतर एक आल्याने जी लय बनते ती लक्षात राहते . ती लय जरा जरी बिघडली की उत्तर चुकतं .
आपल्या इथे तर यात पण एक प्रॉब्लेम आहे. जो इतक्या लवकर आणि इतक्या सहजासहजी सुटणार नाही. शिक्षकांच्या उत्तराबद्दलच्या अपेक्षा . ' माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे लिहिलं नाही म्हणून एक मार्क कापला ' असं करणारे शिक्षक देखील आहेत. मला कळत नाही , परिक्षा ' अभ्यास किती समजला हे दाखवण्यासाठी ' द्यायची असते की अशा शिक्षकांचं मन राखण्यासाठी ? याचा विपरीत परिणाम असा होतो की जो फक्त घोकंपट्टी करून येतो त्याला पैकीच्या पैकी मार्क पडतात , मग भलेही त्याला त्या विषयातलं समजलं काहीही नसेल . आणि जो खरा अभ्यास करतो, अगदी समजून घेऊन , त्याचे अशा ' गरीब ' कारणाने मार्क कापतात . मग सुरु होतो मार्कांचा पाठलाग . अभ्यास बाजूलाच राहतो .
आता या ' गरिबी ' शी किती काळ भांडणार ? का भांडणार ? हा आणखी एक वादग्रस्त मुद्दा . यालाही बाजूला ठेऊया . सध्या फक्त अभ्यास या विषयापुरतं ...
मीही ' सांगितलं ' म्हणून ' घोकलं आणि ओकलं ' . आता काही लक्षात नाही . काय केलं ते देखील लक्षात नाही . मग करून फायदा काय झाला ? तर त्या त्या परिक्षेत मार्क्स तेवढे मिळाले. काही वेळेस तर पैकीच्या पैकी . पण ते मार्क्स घेऊन केलं काय ? पुढच्या वर्गात प्रवेश . नंतर काय ? काही नाही . प्रगती पुस्तकात लिहून येतं , इतक्या पैकी इतके मार्क्स . त्याचं करायचं काय ? मला इतकंच आठवतं , हे ' पाठांतर ' प्रकरण मी शेवटच्या वेळी बारावी बोर्ड परिक्षेसाठी हाताळलं .
इंजिनीअरिंगला आलो तेव्हा एक लक्षात आलं . नुसता घोकून - ज्याला चुकून ' पाठ करून ' असं देखील म्हणतात - जर परिक्षा दिली तर मार्क्स तर पडतील पण नंतर काय ? एक वेळ इंटरव्ह्यूवसुद्धा पास होईल. पण पुढे ज्यावेळी अभ्यासाची खरी गरज असेल तेव्हा काय ? पाठ केलेलं तर वाया गेलंच , मार्क्स पण फक्त मार्कशीट वरती . पण काम येत नाही म्हणून कामावरून नक्कीच काढून टाकतील . मग करायचं काय ? तेव्हा ठरवलं इथून पुढं ' अभ्यास ' करायचा , ' रट्टा ' नाही. इंजिनीअरिंग चे सर्व मार्क्स आज देखील मार्कशीटवरंच आहेत . खरा फायदा झाला तो आयुष्यात . मुद्दा हा की, नुसतं घोकत बसण्यापेक्षा अभ्यास महत्वाचा . या अभ्यासाने मला एक वेगळी दिशा दिली . पहिल्यांदा कळलं , अभ्यास हा ' अभ्यास ' म्हणून केला तर हे सगळं जगंच किती वेगळं आहे.
शाळेत असतांना नको तितकी बंधने असतात. काही करण्यास तितकासा वाव नसतो. अगदी ' लुई सोळावा ' च्या ऐवजी ' सोळावा लुई ' असं लिहिलं तरी मार्क कापतात ( मनासारखं नाही घडलं ना ! आणि असे काही महाभाग इंजिनीअरिंगला सुद्धा होते.) . एक गोष्ट इंजिनीअरिंग ला तेवढी चांगली होती. इथे थोडं फार डोकं वापरायची ' परमिशन ' होती. अगदी परिक्षेतील उत्तर लिहिण्यातसुद्धा . इथे ' अभ्यास ' खरोखर महत्वाचा होता . ( त्यातही अपवादात्मक शिक्षक वगळता . ) आणि त्याच बरोबर इथे मार्क कापण्याची भीती नव्हती. माझा चार वर्षातला अनुभव असा आहे , जे उत्तरं घोकून यायचे त्यांच्या बाबत दोन गोष्टी झाल्या. काही जणांना सगळं ' रट्टा मारून ' पण परिक्षेत काय लिहायचं तेच कळत नसायचं आणि ज्यांना कळायचं त्यांना मार्क्स तर पडायचे पण प्रेझेंटेशन , व्हाईव्हा आणि इंटरव्ह्यूवला सगळी गडबड व्हायची . त्यांचं पुढे काय झालं असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो .
मेडिकल क्षेत्र तर या बाबतीत भलत्याच वळणावर पडेल. तिथे ' ध ' चा ' मा ' म्हणजे मग ' निम हकीम खतरे जान '. आणि अशाच प्रकारे हीच गोष्ट इतरही सर्व क्षेत्रांना लागू . सारांश , अभ्यास हा ' अभ्यास ' म्हणून झाला पाहिजे . नाही तर आज जरी नसलं तरी भविष्यात होऊ शकतं ....
" क्या बोलराय अपुन साला ? आपुन क्या किसीका ट्रीटमेंट करेगा ? .... आपुन को कुछ नहीं आताय । माफ़ करो अपुनको । "
( क्रमशः )
#मीप्रतिक
****

Comments
Post a Comment